महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, एका दिवसात सर्वाधिक 53 जणांचा बळी गेला. त्यामुळे मृतांची संख्या 921 झाली आहे. राज्यात कोव्हिड-19 विषाणूच्या 1026 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 24,427 झाली आहे. आणखी 339 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 5125 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील 28, पुण्यातील 6, पनवेलमधील 6, जळगावमधीळ 5, सोलापूर शहरातील 3, ठाण्यातील 2 आणि रायगड, औरंगाबाद शहर व अकोला शहरातील प्रत्येकी एक अशा एकूण 53 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 29 पुरुष आणि 24 महिला आहेत. मृतांपैकी 21 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 27 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 5 रुग्ण 40 वर्षांखालील होते. या 53 रुग्णांपैकी 35 जणांना (66 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या 921 वर गेली आहे.