रुग्णालयात जागा नाही, स्मशानभूमीत लांबच लांब रांगा ; चीनमधील कोरोनाचा उद्रेक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३डिसेंबर । चीनमध्ये कोरोनाची स्थिती बिकट आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे वैद्यकीय साधनांचा अभाव हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. चीनमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. स्थिती अशी आहे की चीनमध्ये रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर आणि औषधांचा तुटवडा तर आहेच, पण डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. हा धक्कादायक खुलासा चीनी मीडिया रिपोर्ट्समध्ये झाला आहे.

चीनमध्ये रुग्णालयांमधून संसर्ग पसरण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. हेच कारण आहे की चीनमधील बहुतेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे, अशा परिस्थितीत ते लवकरात लवकर रुग्णालयात परतण्याची शक्यता कमी आहे. Guabcha.com सह सर्व चिनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनमधील बहुतांश रुग्णालयांमध्ये डॉक्टर कमी आणि रुग्णांची संख्या जास्त आहे.

यामुळेच चीनमधील आरोग्य तज्ज्ञ लोकांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत, परंतु संसर्ग झाल्यास घरीच स्वतःला क्वारंटाईन करावं आणि फ्लूची औषधे किंवा घरच्या पारंपारिक औषधांनी उपचार घ्यावे, असं सांगितलं जात आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या अडचणी इथंच संपत नाहीत. खरं तर चीनमध्ये नियमित औषधांचाही तुटवडा आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत औषधांचा पुरवठा खूपच कमी आहे.

चिनी फार्मसीमध्ये औषधांच्या प्रचंड मागणीचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी केलेला नियम. त्यानुसार विशिष्ट प्रकारची अँटीपायरेटिक, अँटीव्हायरल, अँटीबायोटिक्स, खोकला, सर्दीची औषधे खरेदी करण्यासाठी खऱ्या नावाने नोंदणी करावी लागते.

आता फक्त चीनच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. वर्ल्डोमीटर्स या कोरोनाच्या आकडेवारीवर नजर ठेवणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत जगात कोरोनाचे 4.92 लाख रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 1374 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता बाहेरील देशांमध्ये दिसत असलेली रुग्णवाढ भारताला किती प्रमाणात परिणाम करेल याबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात करोनाच्या नवनवीन प्रकारांमुळे येऊ लागलेल्या लाटांच्या पार्श्वभूमीवर विषाणूचे जिनोम सिक्वेन्सिंग सुरू करण्यात आले आहे. भारतात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याबाबतच्या नियमासंबंधीच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *