उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन, रवी राणांचा आरोप; शंभूराजे देसाईंनी दिले चौकशीचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ डिसेंबर । उमेश कोल्हे हत्याप्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला. तसंच उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यातही तत्कालीन सरकारचा हात आहे. त्यामुळे याप्रकरणाची आणि उद्धव ठाकरेंची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणीही राणा यांनी केली.

शंभूराजे देसाई यांनी यावेळी रवी राणांच्या मागणीवर सरकारकडून उत्तर दिलं. उमेश कोल्हे हत्याप्रकरणाच्या चौकशी आजवर काय काय घडलं याचा विस्तृत अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल आणि तो येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात येतील असं शंभूराजे देसाई यांनी यावेळी जाहीर केलं. तसंच रवी राणा यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे खरंच याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेनं नेण्यासाठी दबाव आणण्यात आला का? पोलिसांना कुणी-कुणी फोन केले? याचा मुद्देसूद अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल, असं शंभूराजे देसाई यांनी सांगितलं आहे.

रवी राणांनी केले गंभीर आरोप
“हिंदू विचारांचे उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंच हत्या केली गेली होती. पण याचा तपास महिनाभर चोरीच्या उद्देशानं केला गेला. यासाठी काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता. उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. हे लक्षात आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन हे संपूर्ण प्रकरण लक्षात आणून दिलं होतं. त्यानंतर आता सोशल मीडियातील पोस्टमुळेच उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचं तपासात समोर आलं आहे. यामुळे तत्कालीन सरकारनं तपास दाबण्यासाठी प्रयत्न केले याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. तसंच उद्धव ठाकरेंच्या फोनचीही चौकशी केली गेली पाहिजे”, असं रवी राणा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *