मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे तून ये-जा करण्यावर आता बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेसह परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जीवनावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींसाठी वाहतूक बंदी असून, तळेगावात ये-जा करण्यावर बंदी घातली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तळेगावातून इतर ठिकाणी ये-जा करण्यास बंदी घालण्याचा आदेश मावळ- मुळशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 12) दुपारी तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

जीवनावश्यक सेवा देण्यासाठी ज्या व्यक्ती नोकरीनिमित्त विशेषतः रुग्णालय स्टाफ व इतर कामासाठी तळेगावातून बाहेर जात आहेत, अशा व्यक्तींच्या आस्थापनांशी संपर्क साधून सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था काम करीत असलेल्या ठिकाणी करण्याबाबत सांगावे. अनेक लोक विनापरवाना बाहेरून येऊन तळेगावात भाजीविक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार भाजी विक्रेत्यांची संख्या मर्यादित ठेवून शक्यतो घरपोच भाजीपाला पुरविणेबाबत योग्य ते नियोजन करावे. भाजीपाला विक्री करण्यासाठी येत असलेल्या तळेगाव शहराबाहेरील विक्रेत्यांबाबत या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून त्यांची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

. तळेगावात सापडलेला रुग्ण रहिवास करीत असलेला तळेगाव शहर हा भाग केंद्रस्थानी धरून तीन किलोमीटरच्या परिसरातील तळेगाव शहर, माळवाडी, वराळे, कातवी, वारंगवाडी, आंबी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव नगरपंचायत दक्षिण भाग हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित झोन, तसेच पाच किलोमीटरच्या परिसरातील सोमाटणे, इंदोरी व परंदवाडी आदी परिसराचे संपूर्णक्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याआनुषंगाने मावळ तालुक्यात आजपर्यंत आढळून आलेले रुग्ण हे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या विशेषतः रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांमुळे झालेला दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील आदेश काढण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *