राज्यातील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू ; पश्‍चिम महाराष्ट्रातील 5,774 कंपन्यांचे उत्पादन पुन्हा सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटामुळे व्यापार, उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे; परंतु आता राज्यातील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. रेड झोन वगळता अन्यत्र 57,745 उद्योगांना काम सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. त्यापैकी 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. या कंपन्यांमध्ये साडेसहा लाख कामगार रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर (पुणे) यांनी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये देसाई बोलत होते. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या रेड झोनमधील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्य ग्रीन झोन करण्याचा संकल्प केला आहे. तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती देसाई यांनी उद्योजकांना केली.

वीजदेयकात सवलत ; स्थिर वीजदेयकाबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. विजेच्या वापराएवढेच देयक आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीही सवलती जाहीर केल्या आहेत, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.

लघुउद्योगांसाठी लवकरच पॅकेज ; लॉकडाउनमुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकार त्यांच्यासाठी लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयूष गोयल यांच्याशी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारही लघुउद्योगांना इतर सवलती देण्याबाबत धोरण आखत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

विदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न ; राज्यात विदेशी गुंतवणूक येण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरियासह अन्य देशांच्या प्रतिनिधींशी उद्योग विभागाचे अधिकारी गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करत आहेत. राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू होतील, असे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.

लघुउद्योगांना विशेष सवलती
* लघुउद्योगांना विशेष सवलती; उद्योगांना वीजबिलात सवलतीचा प्रस्ताव

* पश्‍चिम महाराष्ट्रातील 5,774 कंपन्यांचे उत्पादन पुन्हा सुरू

* राज्यात एकूण 57,745 उद्योगांना काम सुरू करण्यासाठी परवानगी

* विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वाटाघाटी सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *