महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवीदिल्ली – विशेष प्रतिनिधी – करोना व्हायरसची लढाई ही दीर्घ काळ चालणार आहे. यामुळे जनतेने करोनाचा सामना करताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याचे नियम काटेकोरपणे पाळावेत. करोना व्हायरसविरोधातील लढाईत देशात लॉकडाऊन घोषित केला गेला. आता हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होणार आहे.लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरू होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबाबतची माहिती १८ मे पूर्वी सविस्तरपणे दिली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा कधीपर्यंत असेल याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.
१८ मे पासून हा चौथा टप्पा सुरू होईल. लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा नव्या स्वरूपात असेल आणि नवे नियम लागू केले जातील. राज्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावर हे नियम बदललेले असतील. या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची सविस्तर माहिती १८ मेपूर्वी दिली जाईल, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपणार आहे. हा टप्पा संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यापूर्वी मोदींनी सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. या बैठकीत बहुतेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. तसंच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील नियमांमध्ये काही बदल करण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.