Year Ender 2022: मनोरंजनसृष्टीतील या दिग्गज कलाकारांनी यावर्षी घेतला जगाचा निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ डिसेंबर ।

रमेश देव

अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे महान कलावंत अभिनेता रमेश देव यांचे 2 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या पत्नी सीमा देव यांच्यासोबत ब-याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आझाद देश के गुलाम, घराना, सोने पे सुहागा, गोरा, मिस्टर इण्डिया, कुदरत का कानून, दिलजला, शेर शिवाजी, प्यार किया है प्यार करेंगे, इलज़ाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, गृहस्थी, मैं आवारा हूँ, तकदीर, श्रीमान श्रीमती, दौलत, अशान्ति, हथकड़ी, खुद्दार, दहशत, बॉम्बे ऐट नाइट, हीरालाल पन्नालाल, यही है जिन्दगी, फकीरा, आखिरी दांव, सुनहरा संसार, जमीर, एक महल हो सपनों का, सलाखें, 36 घंटे, प्रेम नगर, गीता मेरा नाम, कोरा कागज, शिकार, सरस्वतीचन्द्र, मेहरबाँन यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

लता मंगेशकर

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. चित्रपटसृष्टी बरोबरच विविध क्षेत्रातील लोकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.लतादीदींनी वयाच्या 13 व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 1942 मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली. ‘एक प्यार का नगमा है’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘एक राधा एक मीरा’ आणि ‘दीदी तेरा देवर दीवाना’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढविला होता. लता मंगेशकर यांना 1969मध्ये पद्मभूषण, 1999 मध्ये पद्मविभूषण आणि 2001 मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 2009 मध्ये ‘ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

प्रदीप पटवर्धन

प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे 9 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. वयाच्या 65 व्या वर्षी त्याने राहत्या घरी (झावबावाडी, चर्नी रोड) अखेरचा श्वास घेतला होता. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची होती. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना हसवले. एक फुल चार हाफ, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

सुनील शेंडे

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे 15 नोव्हेंबरच्या रात्री 1 वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी निधन झाले होते. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीशिवाय त्यांनी वास्तव, गांधी, सरफरोश या हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आमिर खान आणि संजय दत्तसोबत केलेल्या या चित्रपटांसोबतच त्यांनी शाहरुख खानसोबत सर्कस या मालिकेतही काम केले होते. या मालिकेत त्यांनी शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारली होती. सनी देओलचा ‘घायल’, संजयचा ‘खलनायक’ या चित्रपटातही ते दिसले होते. निवडुंग (1989), मधुचंद्राची रात्र (1989), जसा बाप तशी पोर (1991), या मराठी चित्रपटांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. त्यांनी केलेल्या विविध सहाय्यक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

विक्रम गोखले

ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत यांचे 26 नोव्हेंबर 2022 रोजी यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 20 दिवस त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, उपचादारम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने त्यांची स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली होती. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. ‘बॅरिस्टर’ नाटकाने विक्रम यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. जवळपास ८ वर्ष त्यांनी हे नाटक केलं. परखड व्यक्तिमत्त्वासाठी गोखले विशेष ओळखले जायचे.

सुलोचना चव्हाण

लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं 10 डिसेंबर 2022 रोजी निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. 13 मार्च 1933 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला होता. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. तेव्हा व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी तो स्वीकारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *