महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । पुणेकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. पुणे शहरात नव्या वर्षापासून सार्वजनिक व्यवस्थेत बदल पाहायला मिळणार आहे. पुण्यात लवकरच ‘डबल डेकर’ बस धावण्याची शक्यता आहे. पीएमपीएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) च्या ताफ्यात पुढील वर्षी ‘डबल डेकर’ बस येऊ शकतात. त्यामुळे पुणेकर लवकरच नूतन वर्षापासून ‘डबल डेकर’ बसचा प्रवास करण्याची शक्यता आहे. पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीबद्दल पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबद्दल माहिती दिली.
‘डबल डेकर बस पुण्यात सुरू करण्याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. मुंबईमध्ये ‘डबल डेकर’ बस धावत आहेत याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा (infrastructure) पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत’, अशी माहिती ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली.
‘आम्ही मुंबईमधील बेस्टशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवड मध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर या बद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, अशी देखील माहिती ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली.
दरम्यान, पुणेकरांकडून अनेक दिवसांपासून बसमध्ये गर्दी होत असल्याची तक्रार होती. तसेच पुणेकरांना ट्रॅफिक जामचा देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पुणेकरांकडून ‘डबल डेकर’ बसची मागणी होती. पुणेकरांच्या मागणीनंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने ‘डबल डेकर’ बस सेवा सुरू करण्याचा विचार केला आहे.
दरम्यान, ९० च्या दशकात पुणे महानगर परिवहन महामंडळाने ‘डबल डेकर’ बस सेवा सुरू केली होती. ही बस सेवा केवळ शिवाजी नगर आणि त्याच्या परिसरात होती. कारण अनेक कंपन्या त्या परिसरातच होत्या. त्यांनतर आता पुन्हा पुणे महानगर परिवहन महामंडळ ‘डबल डेकर’ बस सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे.