महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । पुरावे नसताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले 14 महिने वाया गेले. त्यांचा दोष काय होता? खासदार संजय राऊत यांच्याबाबतही तसेच घडले. त्यांचाही दोष काय होता? निष्पापांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा महापुरुषांचे अपमान करणाऱ्यांना तुरुंगात धाडा. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल, असा घणाघात गुरुवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, मंगलप्रभात लोढा आणि इतर वादग्रस्त बोलणाऱ्या नेत्यांची अक्षरशः पिसे काढले. यावेळी सभागृहात चिडीचूप शांतता अनुभवायला मिळाली.
आत्मचिंतनाची वेळ आलीय
विधानसभेत गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आणणारे आणि डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे भाषण केले. अजित पवार म्हणाले की, अनिल देशमुखांच्या आयुष्यातले 14 महिने वाया गेले. त्यांचा दोष काय होता? पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले, पण त्याचे पुरावे नव्हते. खासदार संजय राऊत यांच्याबाबत तेच झाले. हे मी म्हणत नाही. कोर्ट म्हणाले. राजकीय मतमतांतर होईल, पण या व्यक्तीच्या आयुष्यातले एवढे महत्त्वाचे दिवस वाया जातात. आरोप सिद्ध झाल्यानंतर काय दिवाणी शिक्षा असेल, ती करा. काय संजय राऊत यांची चूक होती? काय अनिल देशमुख यांची चूक होती? हे जे चाललंय, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलीय. त्यांच्या कुटुंबीयांवर काय वेळ आली असेल. कायदा सुव्यवस्था करणारेच बिघडवत असतील, अशांतता निर्माण करत असतील, तर करायचे काय? असा सवाल अजित पवार यांनी केला.
अशी तुलना कशी?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरही अजित पवारांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले, शिवरायांचा जाज्वल अभिमान बाळगणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळखय. त्यांचा झालेला अपमान महाराष्ट्राच्या जनतेला पटलेला नाही. शिवाजी महाराज पुराने जमाने के है. आजचे आदर्श नितीन गडकरी. त्यांच्याबद्दलही आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण गडकरी साहेब आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकेल का? असा सवाल त्यांनी केला.
राज्यपालांची तक्रार करा
राज्यपाल म्हणाले, कल्पना करो, शादी दस साल में ही कर दी थी. तब जोतीराव तेरा साल के उमर के थे. तब वो क्या करते होंगे शादी के बाद. हातवारे करून, हसत-हसत हे सतत चालू आहे. मुख्यमंत्री काही कामानिमित्त दिल्लीला जाऊ शकतात. त्यांनी दिल्लीत वरिष्ठांच्या कानावर घातले पाहिजे. काल जसे ठोकून सांगितले मुंबई आमचीय तसेच इथेही करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विडा उचलून आलाय का?
समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारतोय?, असे राज्यपाल म्हणाले. कितीदा आमच्या युगपुरुषांचा अपमान करताय. त्यांच्या अपमानाचा विडा उचलून आलाय का? राजमाता जिजाऊंनी त्यांना बाळकडू दिले. एका जाहीर कार्यक्रमात चुकीचा इतिहास सांगितला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःला शांतीदूत समजायचे. त्याच्यामुळे देश कमकुवत राहिला, असे कोश्यारी म्हणाले. मात्र, त्यावेळी देशात टाचणी तयारी व्हायची नाही आणि आता असे बोलले जाते. हे बाकीचे करण्यापेक्षा पंडित नेहरूंबद्दलचे चार पुस्तके वाचा ना. पहाटे चारला उठता. संविधानिक पदाची शोभा राखण्यासाठी असली वक्तव्य टाळावीत, असे आवाहन त्यांनी केले.
ही महाराष्ट्राची शोकांतिका
अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यपाल मुंबईबद्दल काय म्हणाले. गुजराती – राजस्थानी माणसाला मुंबईच्या बाहेर काढले, तर मुंबईत पैसा उरणार नाही. ही भाषा राज्यपाल महोदयांची. त्यांना एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्थिर करायचेय का? त्यामुळे सुरूय का? अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप, आक्रोश, चीडय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर जाहीर आक्षेप आणि निषेध नोंदवतील, अशी अपेक्षा होती. साधा निषेध नोंदवत नाहीत. माघारी बोलावतील अशी अपेक्षा होती. ही महाराष्ट्राची शोकांतिकाय.
लाइटली घेऊ नका…
अजित पवार पुढे म्हणाले की, मंत्र्यांचेही हेच सुरू आहे. चंद्रकांत पाटील याच्या भीक मागितली या वक्तव्याबद्दल ते म्हणाले की, देणगी मागितली, मदत मागितली असे ते म्हणू शकत होते. ज्यांच्याबद्दल असे बोलता. जरा इतिहासात खोलात जा. महात्मा फुले यांच्या कंपनीचा टर्नओव्हर होता २० हजार रुपयांचा होता आणि तेव्हा टाटांचा टर्नओव्हर १९ हजार रुपयांचा होता. त्यांच्यावरच्या शाईफेकीचे समर्थन करत नाही. मात्र, विधानभवनात शाईपेन आणण्यासाठीही बंदी केली. आमच्यावर अविश्वास करता हे बरोबर नाही. लाइटली घेऊ नका.