महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचा फटका शेती पिकांना (Agricultural crops) बसत आहे. कापसासह, तूर, हरभरा, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) देखील झाला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले असून, याचाही पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं ढगाळ वातावरण आहे. काल (5 जानेवारी) अनेक तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं जिल्ह्यातील हरभरा, तूर, कापूस आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आज मोठ्या प्रमाणावर दाट धुक्याची चादर पसरली असून, धुक्यामुळं हरभरा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. अवकाळी पावसानंतर आज दाट धुक्याची चादर पसरलेली आहे. त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि इतरही मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अनेक भागात वाहने चालवणे सुद्धा कठीण झालेले आहे
गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात धुके पसरले आहे. त्यामुळं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी सर्वदूर धुके दाटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा शहरात आज सकाळी सर्वाधिक दाट धुके दिसले. समोरचे दिसत नसल्याने वाहतूक संथ झाली होती. सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.