महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान गुरुवारी त्यांनी मुंबईतील बँकर्स, आघाडीचे उद्योगपती, अभिनेते आणि निर्मात्यांसोबत चर्चा केली. उत्तर प्रदेशात होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेसाठी उद्योगपतींना निमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले होते. तर या दोन दिवसांच्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत माहिती दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत मुकेश अंबानी यांच्यासह देशातील प्रमुख उद्योजकांची भेट घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय की, रिलायन्स समूहाने राज्यभरात 5G तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचा आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.
रिलायन्सप्रमाणेच अदानी समुहानेही उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. अदानी समूहाने एनसीआरमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालय आणि नोएडामध्ये १०,००० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
Had a fruitful meeting with Shri Mukesh Ambani Ji in Mumbai today. pic.twitter.com/NHXK2FFIbs
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 5, 2023
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वी अनेकदा ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच जागतिक गुंतवणूकदार परिषद असेल. या परिषदेकरिता १७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशात येण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील आघाडीच्या उद्योगपतींना उत्तर प्रदेशच्या विकासात भागीदार होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.