ठाकरे गटाचं नाशिकमधील अस्तित्व धोक्यात? ; असंख्य पदाधिकारी शिंदे गटात येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । राज्यातील ठाकरे गटामधील गळती थांबली असली तरी नाशिकमधील गळती काही थांबताना दिसत नाही. जवळपास दोन डझन नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज ठाकरे गटातील असंख्य पदाधिकारी शिंदे गटात जाणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज आणि उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटात मोठं खिंडार पडल्याने ठाकरे गटाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील पक्ष गळती थांबवण्यासाठी, पक्ष बांधणी करण्यासाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी संजय राऊत नाशिकला येत आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे दोनचार नव्हे तर 50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे.

ठाकरे गटाचे नाशिकमधील विधानसभा प्रमुख, उपमहानगरप्रमुख, विभाग प्रमुख असे 50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच आगामी काळात पडझड होऊ नये म्हणून संजय राऊत काय मार्ग काढतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे संजय राऊत वारंवार नाशिकला येऊन पक्षाची बांधणी करत आहेत. मात्र, राऊत यांच्याकडे जबाबदारी सोपवलेल्याच नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाला शिंदे गटाकडून पोखरलं जात आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून संजय राऊत यांच्या नेतृत्वाचा कस लागत आहे.

दरम्यान, नाशिक महापालिकेची निवडणूक केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच पदाधिकारी आणि नगरसेवक ठाकरे गटाला सोडताना दिसत आहेत. त्यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *