मालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्वेग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ जानेवारी । महाराष्ट्रात उद्योग वाढवायचे असतील तर कामात पारदर्शकता हवी. पण आपल्याकडे मालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, असा उद्वेग केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ही संत, साहित्यिक, समाजसुधारक, उद्योजक, विचारवंत, संशोधकांची भूमी आहे. तिला निर्माणकर्त्यांची भूमी बनवू या, निर्यातक्षम देश म्हणून भारताची प्रतिमा तयार करू या, असे आवाहन त्यांनी विश्व मराठी संमेलनातील गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात केले.

संमेलनाच्या सांगतेवेळी ते म्हणाले. मराठीचे मोठेपण महाराष्ट्रात राहून समजत नाही, पण महाराष्ट्राबाहेर गेल्यावर त्याची जाणीव नक्कीच होते. इथले नाटक, साहित्य, काव्य आठवते. आज शहरीकरण वाढले असले तरी ग्रामीण भागात विकासाचा वेग कमी आहे.

कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, श्रीमंत कर्णसिंग सरदेसाई जंभोरीकर, धनश्री जंभोरीकर, जपानचे पहिले भारतीय आमदार योगेंद्र पुराणिक, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संदीप दीक्षित, सुरेश चव्हाण, आनंद गानू, विजय पाटील आदी मंडळी उपस्थित होती. मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. या गुंतवणूक मेळाव्याला जगभरातून ७० हून अधिक उद्योजक आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

शेण ५ रुपये किलो
 गायीच्या शेणाचा वापर करून बऱ्याच गोष्टी करता येणार आहेत. त्यामुळे भविष्यात शेणाला ५ रुपये किलो भाव मिळाला तर शेतकरी का आत्महत्या करील?
 कोकणात उद्योग गेले पाहिजेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा, तिथल्या प्रत्येक गावाचा विकास व्हायला हवा. स्मार्ट सिटीसोबत स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे.
 देशातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करायचे आहे. पुढील इंधन इथेनॉल असेल. यासाठी फ्लेक्स इंधन आणले आहे. हे इंजिन इथेनॉलवर चालले. टोयोटाच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर येणार आहेत.

मराठी माणूस नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा बनायला हवा. येणाऱ्या काळात उद्योजकता वाढवण्याची गरज आहे. हे सरकार गुंतवणूकदारस्नेही असल्याने सर्व मराठी उद्योजकांनी खुल्या मनाने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी.
– नितीन गडकरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *