राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंचा शरद पवारांनी एका वाक्यात निकाल लावला, म्हणाले….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ जानेवारी । महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयवादाच्या राजकारणाला सुरुवात झाली, असा आरोप करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा शरद पवार यांनी राज ठाकरे यांना फारसे महत्त्व न देता त्यांना अनुल्लेखाने मारले.

राज ठाकरे यांच्या टीकेचा प्रतिवाद करताना शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे नेतृत्त्व कोणत्या नेत्यांकडे होते, हे पाहावे. सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ यांनी पक्षाचं नेतृत्त्व केले. त्यानंतर विविध समाजातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्त्व केले. मुळात आमच्या मनात जातीपातीचा विचार येतच नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडर यांच्या विचारांचे लोक आहोत. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांच्या टीकेची फारशी दखल घेत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. यावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार, हे पाहावे लागेल. राज ठाकरे हे आज पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यावेळी ते शरद पवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देऊ शकतात.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुवाहाटी येथे बोलताना नुकतीच एक घोषणा केली होती. १ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण होईल, असे अमित शाह यांनी सांगितले होते. यावरुन शरद पवार यांनी शाह यांना चिमटा काढला. राम मंदिराचे काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. परंतु, ती घोषणा देशाच्या गृहमंत्र्यांनी केली. सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच अमित शाह यांनी ही घोषणा केल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इथे नाखूशअसतील तर आम्ही पण सगळे त्यांच्याबद्दल नाखूश आहोत. पहिले असे राज्यपाल आहेत की सतत त्यांच्यावर टीका होत आहे. जनता त्यांच्यावर टीका करत आहे. महाराष्ट्राला दर्जेदार राज्यपालांची एक चांगली परंपरा आहे. राज्यात अनेक चांगले राज्यपाल आले. जे जे राज्यपाल महाराष्ट्रात आले पक्ष कोणताही असो पण राज्याच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. त्यांनी संविधानाचे रक्षण केले. मात्र, सध्याचे राज्यपाल हे सातत्याने वादात असतात, त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होते. ते चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यामुळे जनतेला त्यांच्याबद्दलची नापसंती व्यक्त करावी लागते, असे शरद पवार म्हणाले. राज्यपाल हे महत्वाचे पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण ती सध्याच्या राज्यपालांकडून राखली जात नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *