महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ जानेवारी । वीज दरवाढी संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची याचिका दाखल केली आहे. या याचिकेत महावितरण कंपनीने सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
मात्र, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करण्याची चिन्ह आहेत. तिन्ही वीज कंपन्यांची दरवाढ मान्य झाल्यास वीज पुरवठ्याचा सरासरी दर अकरा रुपये प्रति युनिटवर जाण्याची भीती असून ही दरवाढ सुमारे 51 टक्के असेल. या प्रचंड दरवाढीने जनतेचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
साल २०२० मध्ये महातविरण कंपनीने वीजेच्या दरात वाढ केली होती. हे दर २०२५ पर्यंत कायम राहणार होते. मात्र गेल्या दोन वर्षात महावितरणाचे बरेच नुकसान झाले आहे. अनेक व्यक्तींनी कोरोना काळत वीज बिल भरले नाही. तसेच वीज गळती, खासगी वीज निर्मिती कंपनीला द्यावे लागणारे अतिरिक्त पैसे. यामुळे महावितरणाचे नुकसान होत आहे. त्यानुसार वीज दरवाढ व्हावी यासाठी महावितरणने आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर विभागांनुसार सहा वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी होणार आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत अंतिम दरवाढ ठरेल आणि एप्रिल २०२३ पासून हे वाढीवदर नव्याने आकारले जाणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची चिंता वाढवणार असल्याचे म्हटले जात आहे.