पिंपरी-चिंचवडचा पारा घसरला; अचानक थंडी वाढल्यास ज्येष्ठांसाठी त्रासदायक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० जानेवारी । उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने विविध प्रमुख राज्यांबरोबरच महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा पारा सोमवारी 15.5 अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरला होता. वातावरणातील थंडी वाढल्याने नागरिकांकडून स्वेटर, कानटोपी, जर्किन, जॅकेट अशा ऊबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. तर, वातावरणातील बदलामुळे होणार्‍या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, सोमवारी पुणे शहराचे कमाल तापमान 29 अंश सेल्सियस तर, किमान तापमान हे 8.6 अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरले होते. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड येथे सोमवारी 29 अंश सेल्सियस इतके कमाल तर, 15.5 अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

अचानक थंडी वाढल्यास ज्येष्ठांसाठी त्रासदायक :
शहरामध्ये अचानक थंडी वाढल्यास त्याचा परिणाम ज्येष्ठांच्या आरोग्यावर होऊ शकतो. ज्येष्ठांची प्रकृती विविध आजारांमुळे क्षीण झालेली असते. अचानक थंडी वाढल्यास अन्ननलिका, श्वसन नलिका आणि घशातील वरच्या भागातील रक्तपुरवठा कमी होण्याची शक्यता असते. पर्यायाने, ज्येष्ठांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना विविध आजार बळावू शकतात, अशी माहिती महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

लहान मुलांनाही वातावरण बदलाचा फटका :
लहान मुलांना वातावरण बदलाचा फटका बसत असतो. ऋतुमध्ये बदल झाल्यानंतर लहान मुलांमध्ये आजार होण्याचे प्रमाण वाढते. सध्या लहान मुलांना थंडी, ताप, खोकला, सर्दी, घसा बसणे आणि श्वसनाचे विकार जाणवत आहेत. लहान मुलांसह सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये श्वसनाचे विकार वाढल्यास त्याचे पर्यावसन न्युमोनिया हा आजारात होऊ शकते. त्यामुळे याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ
वातावरणात थंडी वाढल्याने ऊबदार कपड्यांच्या मागणीत सध्या वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वेटर, कानटोपी, जर्किन, जॅकेट आदी कपड्यांचा समावेश आहे. त्याशिवाय, महिला व तरुणींकडून स्कार्फ, स्वेटर आदींची खरेदी केली जात आहे. त्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

पोषक आहारावर भर :
हिवाळ्याच्या कालावधीत शरीराला पोषक आहार मिळावा, यासाठी डिंकलाडू बनविण्यावर नागरिकांकडून भर दिला जातो. त्यासाठी आवश्यक खारीक, खोबरे, डिंक, बदाम, काजू आदींना चांगली मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खारकेच्या दरामध्ये किलोमागे जवळपास 40 टक्के वाढ झाली आहे. तर, डिंकाच्या दरामध्ये किलोमागे 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. बदामाच्या दरामध्ये 20 टक्के घट झाली आहे. काजूचे दर मात्र स्थिर आहेत.

आहार आणि व्यायाम
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी यांचा योग्य प्रमाणात समावेश असावा. चालणे, धावणे, सायकल चालविणे, पोहणे, योगासन, प्राणायाम असे विविध व्यायाम करावे. वयोमानानुसार पेलवेल एवढाच व्यायाम करावा. व्यायामाचा अतिरेक नको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *