महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ जानेवारी । पुणे आणि परिसरातील सीबीएसईच्या काही शाळांनी मिळवलेले ना हरकत प्रमाणपत्र बनावट असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्याबाबत शिक्षण विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवरही गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
राज्यात सातशेहून अधिक शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यात पुणे जिल्ह्यातील ४३ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित शाळांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून तपासणी करण्यात आली. त्यात २९ शाळा बंद होत्या, तर १४ शाळा सुरू असल्याचे आढळले. कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित शाळांना दंड आकारण्यात आला. त्यापैकी चार शाळांनी प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे दंडाची रक्कम जिल्हा परिषदेकडे भरली.
आता जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.अनधिकृत ठरलेल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या शाळा पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातील असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.