महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ जानेवारी । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वात फरक असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी नाळ सांगणारं आहे. त्यामुळे धर्म सुधारणेची चळवळ सुरू झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर हे औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा एकत्र होता. बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववाद हा संधीसाधूपणाचा होता. तो अवसरवादी होता. उद्धव ठाकरे यांनी आजोबाचं हिंदुत्व घेतलं. तसं जाहीर केल्यामुळे धर्म सुधारणेची चळवळ सुरू झाली आहे. बाळासाहेबांचं मतांचं राजकारण होतं. त्यात आता मी जात नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी भाष्य केलं. मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार आहे. तारीखही मागितली आहे. पाच लाख लोकं बोलावून त्यांचा सत्कार करेन. याचं कारण म्हणजे ते सत्य बोलले. कोणी कोणी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या, मग त्या भीकेतून का असेना हे त्यांना सांगितलं.
तसेच उरलेल्यांनी संस्था खोक्याच्या संस्कृतीतून उभ्या केल्या, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं हे का विसरता? असा सवाल आंबेडकर यांनी केला. तसेच मंत्रिपद टिकवायचंय, भाजपमध्ये राहायचं आहे. तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्य मांडलंय ते सर्वात महत्त्वाचं आहे. असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.