महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ जानेवारी । अबुधाबीच्या एका राजेशाही कुटुंबाचा सदस्य असल्याचं भासवून एका ठकाने दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलला लाखोंचा चुना लावला आहे. तीन महिने तो या हॉटेलमध्ये वास्तव्याला होता. त्याचं बिल न चुकवताच त्याने पोबारा केला. इतकंच नव्हे तर त्याने हॉटेलमधून किमती सामान चोरी केल्याचंही उघड झालं आहे.
1 ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये मोहम्मद शरीफ नावाचा परदेशी माणूस चेक इन करण्यासाठी आला. त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आपण अबुधाबीचे शाह शेख फलाह बिन जायद अल नाहयान यांच्या कुटुंबाचे सदस्य असल्याचं सांगितलं. त्यांच्या काही कार्यालयीन कामासाठीच आपण हिंदुस्थानात आल्याचंही त्याने कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यांचा विश्वास बसावा म्हणून आपलं बिझनेस कार्ड, संयुक्त अरब अमिरातीचं रहिवासी असल्याचं कार्ड आणि संबंधित अन्य कागदपत्रंही दाखवली.
त्यानंतर त्याचं चेकइन करण्यात आलं. शरीफ सुमारे तीन महिने या हॉटेलमध्ये थांबला होता. या कालावधीसाठी त्याचं बिल 35 लाख रुपये इतकं झालं होतं. हॉटेलचा विश्वास कायम राहावा म्हणून त्यापैकी 11.5 लाख रुपये त्याने चुकतेही केले. त्यामुळे उर्वरित रक्कम तो चेकआऊटवेळी देईल असं कर्मचाऱ्यांना वाटलं. शरीफ हा 20 नोव्हेंबरपासून अचानक गायब झाला. त्यानंतर तो परतलाच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शंका निर्माण झाली. त्यांनी त्याच्या खोलीची तपासणी केली. तेव्हा त्याच्या खोलीत असलेल्या हॉटेलमधील अनेक मौल्यवान वस्तू गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यात अनेक चांदीची भांडी देखील होती. त्याखेरीज अन्य अनेक वस्तू त्याने चोरल्या होत्या.
फसवणुकीची खात्री पटल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने दिल्ली पोलिसांना त्याची माहिती दिली. आरोपीविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. त्याच्या हॉटेलमधील वास्तव्याचं बिल आता 23 लाख 46 हजार इतकं आहे. ते न चुकवताच तो फरार झाला आहे.