शिवसेनेपुढे मोठा पेच, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचं काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२१ जानेवारी । धनुष्यबाण कुणाचे? याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत त्याआधी म्हणजेच 23 जानेवारीला संपत आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

१७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदावर कुठलीही नियुक्ती झाली नाही. शिवसेनाप्रमुख एकच होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच राहतील अशी भावनिक भूमिका त्यावेळी शिवसेनेनं घेतली. त्यानंतर 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केली गेली. २३ जानेवारी २०१८ या दिवशी पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच निवड झाली.

नेमकं या गोष्टीवर शिंदे गटाने बोट ठेवलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंनी तयार केलं आहे ते घटनाबाह्य आहे असा दावा मागच्या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आता निवडणूक आयोगाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *