बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी सांगलीतील नऊजणांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२१ जानेवारी । सांगलीः इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील दोन लाखांचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी नऊजणांनी दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने नऊजणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सांगली जिल्हा रुग्णालयाकडून रोहिदास भानुदास कांबळे यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहे. या प्रमाणपत्राच्या प्रतीवर नऊजणांनी स्वतःची नावे घालून बोगस प्रमाणपत्र सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील दोन लाखांच्या आर्थिक मदतीसाठी सादर केली. कामगार आयुक्त कार्यालयाने ही प्रमाणपत्रे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे पडताळणीसाठी पाठविली होती. पडताळणीत नऊजणांनी बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सिव्हिल प्रशासनाने पोलिसांत फिर्याद दिली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संतोष अशोक चौगुले (रा. इंदिरानगर, सांगली), प्रवीण पांडुरंग वारे (रा. विलासराव शिंदेनगर, आष्टा), मुमताज सलीम मुजावर (इंदिरानगर, सांगली), महेश दत्तात्रय देवकुळे (रा. बुधगाव रोड, सांगली), गुलाब दिलीप गडदे (हनुमाननगर, सांगली), गुलाब अमीर मदारी (रा. बुधगाव रोड, सांगली), बुद्धदास रुद्राप्पा कांबळे (रमामातानगर, सांगली), बाबासाहेब जयवंत होवाळे व अजित प्रभाकर आवळे (रा. इंदिरानगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मानसिंग भोसले (रा. आष्टा) यांनी फिर्याद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *