मुंबईच्या झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांचा छापा, कोट्यवधींची रोख अन् सोन्याची लूट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ जानेवारी । सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईंचा धसका आता सर्वांनीच घेतलेला दिसत आहे. मुंबईतील झवेरी बाजारात ईडीचे अधिकारी असल्याचं भासवून छापा टाकून व्यावसायिकाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर काल दुपारी दोनच्या सुमारात चार अज्ञातांनी ईडी अधिकारी असल्याचं सांगत बनावट छापा टाकला. बनावट अधिकाऱ्यांनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि जवळपास तीन किलो सोनं लुटलं आहे. सोन्याची किंमत जवळपास १ कोटी ७० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे, दहिसर आणि इतर काही ठिकाणी पथकं रवाना झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *