महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । कोकणकिनारपट्टीवरील लोकांना माशांचे कालवण म्हणजे जीव की प्राण. महाराष्ट्राबरोबरच केरळ भागातील लोकंही मासे आवडीने खातात. पण या भागातून माशांबाबतीत एक चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. एका महिलेने बाजारातून मासे खरेदी केले मात्र, मासा कापताना तिला असं काही आढळलं की त्यामुळं ती काळजीत पडली. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
कोझिकोड येथील ऑन्कोपॅथॉलॉजीस्ट असलेल्या नीना मॅम्पिली यांनी त्याच्या परिसरातील स्थानिक बाजारातून मासे विकत घेतले. त्यानंतर मासे कापताना त्यांना त्यात काहीतरी वेगळं जाणवलं. त्यामुळं त्यांनी माशाचा एक तुकडा प्रयोगशाळेत पाठवला. त्यानंतर त्याचा आलेला निकाल पाहून त्यांना धक्काच बसला.
मासे कापत असताना त्यांना माशांमध्ये फॉर्मेलिन असल्याचा संशय आला म्हणून त्यांनी ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी दिलं आणि त्यांची शंका खरी ठरली. हेच मासे ते शिजवून कुटुंबीयांसोबत खाणार होतात.
फॉर्मेलिन म्हणजे काय?
फॉर्मेलिन हा मेथॉनल गॅसचा एक प्रकार आहे. मासे ताजे दिसावेत यासाठी त्याचा वापर केला जातो. तसंच, शरीरातील पेशी डिकम्पोज होऊ नयेत म्हणूनही फॉर्मेलिनचा वापर केला जातो. मात्र, हे रसायन शरिरासाठी घातक असतं. याचा परिणाम दूरगामी शरिरावर होतो. त्यामुळं किडनी, श्वासननलिकेवर, मेंदूवर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कॅन्सरचा धोका बळावतो.