महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । भारत निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवारी अर्ज मंगळवार (दि. 31) पासून स्वीकारण्यात येणार आहे. हे अर्ज 7 फेबु्रवारीपर्यंत थेरगावच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावरील कार्यालयात घेण्यात येणार आहेत. चिंचवड विधानसभेचे भाजप आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर 15 दिवसात निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होईल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10 हजार व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 हजार रुपये अनामत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येतील. निवडणूक यंत्रणेचे कामकाज सुरू असून विविध कक्ष कार्यान्वित केले आहेत. त्यासाठी 250 अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणुकीची अधिसूचनाही मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे.
प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित नाहीत
पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत; मात्र अद्याप भाजप, महाविकास आघाडी, आप, एमआयएम या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. कोणाला उमेदवारी मिळणार याची शहरात उत्सुकता लागली आहे.
निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे – 31 जानेवारी ते 7 फेबु्रवारी
अर्जांची छाननी – 8 फेब्रुवारी
अर्ज माघारीचा शेवटचा दिवस – 10 फेब्रुवारी
मतदान – 26 फेब्रुवारी
मतमोजणी – 2 मार्च