अनिल परबांचा स्वत:च्याच कार्यालयावर हातोडा : म्हाडाच्या कारवाईआधीच केले तोडकाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । माजी परिवहन मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले आहे.आज भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी 12.30 वाजता या ठिकाणी भेट देणार आहेत.

किरीट सोमय्यांची म्हाडाकडे तक्रार
अनिल परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात जनसंपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाकडे केली होती.

म्हाडाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अनिल परब यांना नोटीसही बजावली होती. म्हाडाच्या चौकशीत हे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे. आज 31 जानेवारी रोजी म्हाडा या बांधकामावर तोडक कारवाई करण्याची शक्यता होती.

नामुष्की टाळण्यासाठी
म्हाडा प्रशासनातर्फे वांद्रे येथील अनिल परबांच्या कार्यालयावर आज तोडक कारावाई होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही नामुष्की टाळण्यासाठी अनिल परब यांनी स्वत:च हे बांधकाम पाडले आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. परब यांनी हे कार्यालय तोडण्यात 2 ते 3 दिवसांपासून सुरूवात केली होती.

2021 मध्येच तोडण्याचे आदेश
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या वांद्रे येथील जमीनदोस्त कार्यालयाचे फोटो ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमय्यांनी म्हटले आहे की, म्हाडा वांद्रे पूर्व येथील अनिल परब अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश लोकायुक्तांनी नोव्हेंबर 2021 मध्ये दिले होते. ठाकरे सरकारने ते वाचविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, आता हे बांधकाम पाडण्यात आले आहे.

आता साई रिसॉर्टची वेळ
तसेच, आधी मिलिंद नार्वेकर यांचा मुरूड दापोली समुद्र किनाऱ्यावरील बंगला तुटला. अनिल परबांचे अनधिकृत कार्यालयही पाडण्यात आले आहे. आता दापोली येथील साई रिसॉर्टवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

मिलिंद नार्वेकरांचा बंगलाही जमीनदोस्त
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक व अत्यंत निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या मुरूड दापोली समुद्र किनाऱ्यावरील बंगलाही वर्षभरापूर्वी जमीनदोस्त करण्यात आला होता. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन या बंगल्याचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर प्रशासनातर्फे या बंगल्यावर कारवाई करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *