महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणारच? संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ फेब्रुवारी । “आम्ही असं म्हणतोय की, आम्ही आमची बाजू पुराव्यासह भक्कमपणे मांडलेली आहे. दहाव्या शेड्यूलनुसार 40 आमदारांनी पक्षाविरोधी, पक्षाचा व्हिप झुगारुन मतदान केलेलं आहे. हा सरळसरळ त्यांना अपत्रा ठरवण्यासाठी पुरावा आहे. आतापर्यंत असे निकाल लागले आहेत. अरुणाचल प्रदेश आणि अन्य ठिकाणी असे निकाल लागले आहेत”, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांचा हा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो. कारण शिंदे गटाच्या आमदारांवर राऊत सांगत असतील तशी अपात्रतेची कारवाई झाली तर हे सरकार खरंच कोसळू शकतं. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार किंवा मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात. “जोपर्यंत ते अन्याय करत नाहीत तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायलाच हवा. एक स्वतंत्र स्वायत्त ती संस्था आहे. न्यायालय, संसद आणि निवडणूक आयोग या स्वायत्त संस्था घटनेने निर्माण केलेल्या आहेत. त्याला राजकीय रंग लागू नये, असं आपलं म्हणणं असतं. पण गेल्या काही वर्षांत अनेक संस्थांना तो राजकीय रंग लागल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे. न्यायालयाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न होतोय”, असं संजय राऊत म्हणाले.

“आम्ही संपूर्ण सत्य मांडल्यानंतर आमच्या अपेक्षा आहेत की, या स्वायत्त संस्थेने न्याय करावा. आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. जोपर्यंत आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत अपेक्षा ठेवू. निकाल लागल्यावर आम्ही आमचं मत मांडू”, अशी भूमिका राऊतांनी मांडली.

‘आमदार-खासदार फुटणं म्हणजे पक्ष फुटणं असं होत नाही’
“आताचं सरकार न्यायप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्य, न्याय, कायदा याबाबत जास्त आस्था आहे. त्यामुळे न्याय होईल, असं आम्हाला वाटतं. एकतर सर्व बंडखोर आमदार अपात्र ठरले पाहिजेत. पक्ष फुटलेला आहे. जे फुटून गेलेले आहेत ते पक्ष आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. पक्ष मूळ हा आपल्या जागेवरच असतो. काही लोकं फुटून गेले”, असं राऊत म्हणाले.

“आमदार-खासदार फुटणं म्हणजे पक्ष फुटणं असं होत नाही. ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जो अधिकार होता त्या अधिकाराने त्यांना तिकीट दिलं. त्यातून त्यांना निवडून आणलं गेलं. त्यामुळे त्यांचा निकाल आधी लागेल. मग आमचं कायल होईल ते होईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“शिवसेनेची घटना काय आहे याबाबत पुरेसे खल निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात झालेले आहेत. आमच्या पक्षामध्ये सर्वाधिक अधिकार प्रतिनिधी सभेने पक्षप्रमुखांना दिलेले आहेत. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. शिवसेना पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे. त्यांनाच सर्व अधिकार दिलेले आहेत. आमची बाजू न्यायाची आणि सत्याची आहे. त्यामुळे निकाल आमच्या विरोधात जाईल, असं मला वाटत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“मी जर-तरमध्ये जात नाही. शिवसेना या पक्षाला 55 वर्षांचा इतिहास आहे. याआधीदेखील अनेक आमदार फुटून गेले. यावेळी आकडा जरी मोठा असला तरी ते फुटीरच आहेत. उद्या कुणीही कुठला पक्षातून बाहेर पडेल आणि सांगेल हा माझा पक्ष आहे. पण तसं होत नाही. पक्ष हा मूळ पक्ष असतो. तुमचा गट तुम्ही वेगळा करा. त्या गटावर तुम्ही निवडणुका लढवून जिंकवून दाखवा. मग सिद्ध करा की तुमचाच पक्ष खरा आहे”, असं राऊत म्हणाले.

“जसं इंदिरा गांधी या काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्या आणि त्यांनी सिद्ध केलं की मी म्हणजेच काँग्रेस. इंदिरा यांच्या नावाची काँग्रेसच पुढे रुजू झाली. तेवढी तुमच्यामध्ये हिंमत आहे का? तुम्हाला बाळासाहेब ठाकरे पाहिजेत, धनु्ष्यबाण चिन्ह पाहिजे, शिवसेना नाव पाहिजे, मग तुमचं काय आहे? तुमचं स्वत:चं काय आहे? तुम्ही फक्त भाजपकडून लिहून दिलेली भाषण वाचत आहेत. स्वत:चं काय? तुमचं हायकमांड दिल्लीमध्ये, दुसरं हायकमांड सागर बंगल्यावर, मग तुमच्याकडे काय आहे? तुमची शिवसेना कुठे आहे? शिवसेना आमच्याकडे आहे”, असा दावा संजय राऊतांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *