महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ फेब्रुवारी । आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
अर्थसंकल्पाची तयारी खूप आधीपासून सुरू होते. अनेक चर्चेनंतर आणि अनेक प्रक्रियेतून गेल्यानंतर अर्थसंकल्प तयार होतो. अर्थसंकल्प छपाईपासून संसदेत सादर करेपर्यंत एक मोठी आणि गोपनिय प्रक्रिया आहे. तर जाणून घ्या, बजेट कोण तयार करते? अर्थसंकल्पाबद्दलची गुप्तता कशी राखली जाते ? यामागे नेमका काय आहे इतिहास ?
अर्थसंकल्प एक अत्यंत गोपनीय दस्तावेज आहे. त्यामुळे अर्थसंकल्पासंबंधित एकही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून ते तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना 10 दिवस नजरकैदेत ठेवले जाते. या अधिकाऱ्यांचा बाह्य जगाशी कोणताही संपर्क राहत नाही आणि अधिकारी 10 दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात राहतात. त्यांना त्यांच्या घरीही जाऊ दिले जात नाही. सर्व जण अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतरच प्रेसमधून बाहेर पडतात. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पास दिला जातो, ज्यामुळे ते कधीही बाहेर जाऊ किंवा येऊ शकतात.
अर्थसंकल्प तयार करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लॉक-इन कालावधी हा हलवा समारंभानंतर सुरू होतो. गेल्या वर्षी कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून केंद्रीय अर्थसंकल्प प्रथमच पेपरलेस सादर करण्यात आला आणि लॉक-इनमध्ये पाठवण्यापूर्वी अर्थसंकल्प टीममध्ये सामील असलेल्या मुख्य कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले होते.
अर्थसंकल्प तयार होत असताना शेवटच्या 10 दिवसांत इंटरनेट वापरावर बंदी घातली जाते. मोबाईल नेटवर्क काम करत नाही. फक्त लँडलाईनवरूनच संभाषण शक्य असते. फक्त अर्थसंकल्प दस्तऐवज तयार करणाऱ्या टीमलाच नाह, तर त्याच्या छपाईशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बाहेर येण्यास किंवा सहकाऱ्यांना भेटण्याची परवानगी नसते. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्थाही तिथेच केली जाते.
या 10 दिवसांत एखादा कर्मचारी आजारी पडला तर त्याला उपचारासाठी रुग्णालयातही जाऊ दिले जात नाही. लॉक-इन कालावधीत वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज डॉक्टरांचे पथक उपस्थित आहे. जास्त आजारी असल्यास त्याला राममनोहर लोहिया रुग्णालयात नेले जाते. जिथे चोख बंदोबस्त असतो. तिथे कर्मचारी कुटुंबीयांनाही भेटू शकत नाही.
कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगपासून गोपनीय दस्तऐवजांचे संरक्षण केले जाते. ज्या कॉम्प्यूटरवर बजेट संबंधित कागदपत्र आहेत. या प्रक्रियेत वापरण्यात येणारे सर्व संगणक एकमेकांपासून डी-लिंक करण्यात येतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगची भीती राहत नाही. हे संगणक फक्त प्रिंटर आणि प्रिंटिंग मशीनशी जोडलेले असतात. अर्थ मंत्रालयाच्या प्रिंटिंग प्रेस असलेल्या भागात निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच जाण्याची परवानगी असते.
1950 पर्यंत बजेटची छपाई राष्ट्रपती भवनात होत होती. परंतु 1950 मध्ये बजेटचा काही भाग लीक झाला होता. त्यानंतर नवी दिल्लीतील मिंटो रोड येथे असलेल्या प्रेसमध्ये छपाई सुरू झाली आणि त्यानंतर 1980 पासून नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंट मधूनच छापण्यात येऊ लागला.
छपाई आणि पॅकिंग पूर्ण झाल्यानंतर विशेष सुरक्षेत अर्थसंकल्पाचा दस्तावेज संसद भवनात आणला जातो. संसद भवनात हा दस्तावेज तेथील सुरक्षा अधिकारी आपल्या ताब्यात घेतात. अर्थ मंत्रालयात माध्यमांना जाण्यास मनाई असते. विशेष परिस्थितीमध्येच विशेष पास देऊन त्यावर पत्रकारांना अर्थ मंत्रालयात सोडले जाते.
हलवा समारंभ ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. वर्षानुवर्षे अर्थमंत्री ही परंपरा पाळत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या अंतिम प्रक्रियेसाठी हलवा समारंभ साजरा केला जातो. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो. या कार्यक्रमात अर्थमंत्री आणि वित्त मंत्रालयाचे सर्व अधिकारी सहभागी होतात. तिथे उपस्थित लोकांमध्ये हलवा वाटला जातो. बजेटची कागदपत्रे छापण्याची प्रक्रिया हलव्याच्या समारंभापासून सुरू होते. यानंतर अर्थसंकल्पीय प्रक्रियेशी संबंधित लोक संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयात राहतात.
26 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हलवा वाटप करून अर्थसंकल्पाच्या दस्ताऐवजांना अंतिम रूप दिलं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात ही परंपरा खंडित झाली होती. दोन वर्षांनी पुन्हा एकदा हलवा वाटपाचा समारंभ पार पडला.
26 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हलवा वाटप करून अर्थसंकल्पाच्या दस्ताऐवजांना अंतिम रूप दिलं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात ही परंपरा खंडित झाली होती. दोन वर्षांनी पुन्हा एकदा हलवा वाटपाचा समारंभ पार पडला.
सरकार अर्थसंकल्प तयार करण्यास केव्हा सुरू करते?
बजेट बनवण्याची तयारी साधारणपणे 6 महिने अगोदर म्हणजेच साधारणपणे सप्टेंबरमध्ये सुरू होते.
सप्टेंबरमध्ये, मंत्रालये, विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिपत्रक जारी करण्यात येते, ज्यात त्यांना येत्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या खर्चाचा अंदाज लावण्यास आणि त्यासाठी आवश्यक निधीचा डेटा देण्यास सांगितले होते.
या आकडेवारीच्याआधारे अर्थसंकल्पात लोककल्याणाच्या योजनांसाठी वेगवेगळ्या मंत्रालयांना निधीची तरतूद केली जाते.
अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दररोज अर्थमंत्री, वित्त सचिव, महसूल सचिव आणि खर्च सचिवांची बैठक होते.
ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून वित्त मंत्रालय इतर मंत्रालये आणि विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेते आणि कोणत्या मंत्रालयाला किंवा विभागाला किती निधी द्यायचा हे ठरवते.
संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बजेट तयार करणाऱ्या टीमला पंतप्रधान, अर्थमंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष यांच्याकडून सातत्याने इनपुट मिळत असते. बजेट टीममध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असतो.
अर्थसंकल्प तयार करून ते सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अनेक उद्योग संघटना आणि उद्योग तज्ज्ञांशी चर्चाही करतात.
अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व बाबी अंतिम झाल्यानंतर, एक ब्लू प्रिंट तयार केली जाते. अर्थसंकल्पाबाबत सर्व काही ठरल्यानंतर अर्थसंकल्प दस्तऐवज छापला जातो.