महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ फेब्रुवारी । ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे. पाठीचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून या मालिकेचा पहिला सामना ९ फेब्रुवारीला नागपुरात रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे श्रेयस पहिला कसोटी सामना खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
याच दुखापतीमुळे श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला होता. सध्या त्याला 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशातच त्याच्या जागी टी-20 मध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला पदार्पण करण्याची संधी दिली जाणार आहे.
नुकतीच भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या सिरीजसाठी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाकडून (Team India) सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सूर्याची कामगिरी बघता निवड समितीने त्यावर विश्वास दाखवला आहे.