महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ फेब्रुवारी । पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविवारी (दि. ५) संध्याकाळपर्यंत निश्चित होतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना (ठाकरे गट) आग्रही असल्याच्या प्रश्नावर यासंबंधीचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ घेतील, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीचा निर्णय झाला का? अशी विचारणा केली असता पवार म्हणाले, यासंबंधी आज (शनिवारी) बैठक सुरु आहे. त्यात अद्याप काही निर्णय झालेला नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होतील.
चिंचवडची जागा शिवसेनेला मिळण्याबाबत खासदार संजय राऊत आग्रही असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, प्रत्येकाला आपापल्या पक्षासाठी आग्रह धरण्याचा अधिकार आहे. पंरतु मविआचे वरिष्ठ यासंबंधी अंतिम निर्णय घेतील, त्या पद्धतीने सगळे वागतील असा मला विश्वास आहे.