महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब समोर येत आहे. आज एकाच दिवसांत राज्यात 1200 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. एकाच दिवसांत 1200 रुग्ण बरे झाल्याची ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 25 टक्के इतका असून राज्याचा मृत्यू दर हा 3.2 टक्के असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पावसाळा जवळ आला असताना इतर आजारांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी खासगी दवाखाने सुरु करावेत, यासाठी शासन आणि डॉक्टरांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्य सचिवांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात समन्वय समिती नेमण्यात आली. रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला असून त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधीकारीही नेमले असल्याचं ते म्हणाले. शिवाय आरोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदं दोन महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात दिवसभरात 15 हजार कोविड चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी 67 प्रयोगशाळा काम करत आहेत. राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी साधनांची कमी नाही. गेल्या काही दिवसंपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर्सची उभारणी केली जात आहे.