महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि राजकीय चिन्ह धनुष्यबाण दोन्हीवर शिंदे गटाचा दावा शुक्रवारी (ता.१७) मान्य केला. त्यामुळे शिवसेना पक्षावर शिंदे गटाकडे मालकी जाणार असली तरी दादरचे शिवसेना भवन, पक्षाचे मुखपत्र मानले जाणारे सामना दैनिक आणि मार्मिक हे साप्ताहिक यांची मालकी मात्र ठाकरे गटाकडे राहणार आहे.
मुंबईमध्ये २२७ महापालिकेचे प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या एकापेक्षा अधिक शाखा आहेत. या शाखांची मालकी ठाकरे गटाकडे असल्यामुळे त्या शिंदे गट मिळवण्याचा प्रयत्न करेल. या शाखा बहुतांश अनधिकृत असून स्थानिक शिवसैनिकाकडून त्या चालवल्या जातात. यातील काही शाखा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात. दादरचे सेना भवन यावर पक्षाची मालकी नाही, शिवाई ट्रस्टची ही मालमत्ता आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते लीलाधर डाके या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. शिवसेना पक्षाचे हे मध्यवर्ती कार्यालय आहे. जरी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेला असला तरी दादरचे सेना भवन मात्र उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात राहणार आहे. सामना हे दैनिक आणि मार्मिक हे साप्ताहिक शिवसेनेची मुखपत्रे मानली जातात, पण ती प्रबोधन प्रकाशन या संस्थेचे प्रकाशन असून ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ती उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावर शिवसेना पक्षाची मालकी प्रस्थापित होऊ शकत नाही. आजपर्यंत शिंदे गटाला ठाकरे गटाकडून गद्दार संबोधले जात होते. शिवसेना व धनुष्यबाण याची मालकी शिंदे गटाकडे अधिकृतपणे गेल्याने गद्दार शिक्का पुसला गेला. सेनेचे नेते मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडे असले तरी कार्यकर्ते ठाकरेंकडे होते. मात्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण याची मालकी शिंदे गटाकडे गेल्याने कुंपणावरचे शिवसैनिक आता शिंदे यांच्याकडे जातील. या निर्णयाचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणुकीत बसेल. निवडणूक चिन्ह आणि पक्ष दोन्ही शिंदे गटाकडे असल्यामुळे शिंदे-फडणवीस यांची सत्ता महापालिकेत निर्माण होणे शक्य होईल. विधिमंडळातील शिवसेना कार्यालयावर आजपर्यंत उद्धव ठाकरे गटाचाच ताबा होता. आता मात्र अधिकृतपणे या कार्यालयावर तसेच मंत्रालयासमोर असलेल्या शिवसेनेच्या शिवाई कार्यालयावरही शिंदे यांचा ताबा येईल. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळू शकते. त्याचा एकनाथ शिंदे आणि भाजपला निवडणुकीत फटका बसू शकतो.