महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 17) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डासह किराणा दुकाने व मंडईमध्ये उपवासाच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी, साबुदाणा, भगर, शेंगदाणा यांसह रताळी, कवठांची खरेदी करण्यासाठी गृहिणीवर्गाची लगबग दिसून आली.
राज्यातून कराड तसेच बीड आणि परराज्यांतील कर्नाटक येथून रताळी बाजारात दाखल झाली. किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. गावरान रताळी चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे या रताळ्यांना जास्त मागणी आहे.
तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यातून दाखल होणार्या साबुदाण्याला सर्वाधिक मागणी आहे. किरकोळ बाजारात साबुदाण्याचे भाव 85 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एरवीच्या तुलनेत साबुदाण्याच्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी, घाऊक बाजारात साबुदाण्याच्या भावात किलोमागे 8 ते 10 रुपयांनी वाढ आहे. नाशिक येथून बाजारात येणार्या भगरीला मागणी आहे.उत्पादन चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात भगर बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे, भगरीचे दर टिकून आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून शेंगदाण्याची आवक होत आहे. बाजारात घुंगरू शेंगदाणा 110 ते 130 रुपये व स्पॅनिश शेंगदाणा 130 ते 140 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत आहे.
कवठाने खाल्ला भाव
मार्केट यार्डात अहमदनगर, औरंगाबादसह जिल्ह्यातील पुरंदर भागातून कवठ दाखल झाली. त्याच्या प्रतिशेकड्याच्या पोत्यास 800 ते 1500 रुपये भाव मिळाला. कवठांपासून उपवासाची चटणी, साधी चटणी केली जाते. किरकोळ बाजारात एका कवठासाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत आहे.