कोरोना हा आजार बरा होऊ शकतो ; केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – भारतात देशव्यापी लॉकडाऊनच्या ५७ व्या दिवशी करोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक लाख ६ हजारांवर गेली असली तरी उपचाराअंती बरे झालेले रुग्ण ४० टक्क्यांच्या घरात असल्यामुळे हा आजार बरा होऊ शकतो आणि त्याला रोखण्यासाठी भारताने केलेली उपाययोजना परिणामकारक ठरली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

उपचाराअंती बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आणि त्यांची टक्केवारी बघता हा आजार बरा होऊ शकतो आणि त्यासाठी भारताने अवलंबिलेली वैद्यकीय व्यवस्थापन पद्धती प्रभावी ठरली असल्याचे मत आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केले. सर्व सक्रिय रुग्णांपैकी व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या ०.४५ टक्के, ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या २.९ टक्के आणि आयसीयूमधील ३ टक्के आहे. आज जगात एक लाखामागे ६२ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर भारतात हेच प्रमाण एक लाखामागे ७.९ आहे. जगात करोनामुळे एक लाखामागे ४.१ लोकांचा मृत्यू होत असताना भारतात हे प्रमाण लाखामागे ०.२ इतके आहे. करोनाने प्रभावित झालेल्या ९-१० प्रमुख देशांमध्ये हे प्रमाण एक लाखामागे १० जणांचे आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.

देशभरात आजवरच्या करोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६ हजार ७५० झाली आहे. त्यापैकी ४२ हजार २९८ करोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ३९.६२ आहे. २४ तासात ३१२४ रुग्ण बरे झाले. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ६१ हजार १४९ इतकी असून गेल्या २४ तासात करोनाच्या ५६११ नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात १४० जणांचा मृत्यु होऊन एकूण मृतांचा आकडा ३३०३ वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत २५ लाख १२ हजार ३८८ जणांच्या करोना चाचण्या झाल्या असून गेल्या २४ तासात १ लाख ८ हजार १२१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *