महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० फेब्रुवारी । शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश न दिल्याने तसेच प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिवभक्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले. शिवनेरीवर हे कसलं व्हीआयपी कल्चर, हे चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त करीत शिवभक्तांना प्रवेश दिल्याशिवाय किल्ल्यावर जाणार नाही, अशी भूमिका घेतली.
किल्ले शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमासाठी काही मर्यादित लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. यादरम्यान शिवप्रेमींना गडावरील प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रचंड संख्येने शिवप्रेमी गडाच्या पायथ्याशी थांबून होते. याचवेळी संभाजीराजे छत्रपती हे गडावर जात असताना त्यांना शिवप्रेमींनी त्यांची नाराजी सांगितली. शिवप्रेमींचा हा संताप बघून संभाजीराजे हे आक्रमक झाले. ते म्हणाले, शिवप्रेमींना इथं बोलवायचं आणि दर्शन घेऊ द्यायचं नाही, हे चालणार नाही. शासकीय कार्यक्रम सकाळी दहा वाजेपर्यंत करा. त्यानंतर शिवप्रेमींना जाऊ द्या. दरवर्षीही होत आहे. आता किती सहन करायचं? असा सवाल करून ते म्हणाले, रायगडावर राज्याभिषेक सोहळा होतो, त्यासाठी अशी अडवणूक होत नाही. मग शिवनेरीवर शिवरायांच्या दर्शनाकरता पर्यटन आणि पुरातत्व खाद्याचे वेगळे धोरण कशासाठी? असे सांगत त्यांनी शिवप्रेमींसोबत थांबण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्याच्या आवाहनासदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सर्वसामान्य शिवभक्तांच्या भावना त्यांनी बोलून दाखविल्या.
मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवर शिवप्रेमींना येण्यासाठी कोणतीही बंदी नसेल, असे जाहीर केले. यावेळी शिवभक्तांची जी अडवणूक झाली ती पुढच्या वर्षीपासून होणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
शिवनेरीवर भगवा ध्वज लावा…
शिवनेरीवर भगवा ध्वज लावावा, या मागणीसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी खांद्यावर भगवा झेंडा घेत भगवा जाणीव आंदोलन केले व शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार टाकला.