राजकारण तापणार ; अमित शहा यांचे ठाकरेंवर टीकास्त्र, ठाकरेंचाही पलटवार, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० फेब्रुवारी । ‘सत्तेची हाव सुटल्याने उद्धव ठाकरे हे शरद पवारांना शरण गेले,’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कोल्हापुरातील कार्यक्रमात केली. ‘आगामी लोकसभा निवडणुका राज्यात भाजप आणि शिवसेना सोबत लढवेल. राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी,’ असेही शहा यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. शहा यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा घेण्यात आला. त्या वेळी त्यांनी लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला. शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले; तसेच अंबाबाईचे दर्शनही घेतले.

‘आगामी लोकसभा निवडणूक भाजप व शिवसेना एकत्र लढवेल. उरलेसुरले एकत्र येऊन लढतील; पण विजय आमचाच असेल. अंबाबाईच्या दर्शनानंतर विजय मिळतो. तेव्हाही विजय नक्की मिळेल. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविली; पण सत्तेची हाव सुटल्याने निवडणुकीनंतर ठाकरे हे शरद पवार यांना शरण गेले. आम्ही सत्तेसाठी विचार बदलला नाही. आता मात्र खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. आम्हाला सत्तेचा लोभ कधीच नव्हता. आमचे जास्त आमदार असतानाही आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले, हा त्याचा पुरावा आहे,’ असे शहा म्हणाले.

शिंदे गटाचे ‘कॅव्हेट’

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतल्यावर या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटही सक्रिय झाला असून, त्यांच्यातर्फे न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : ‘मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला, शरद पवार यांना शरण गेल्याची टीका माझ्यावर होत आहे. पण आता राज्यात जे काही चालले आहे, त्यात कोण कुणापुढे कसली शरणागती पत्करतो आहे, तेच कळेनासे झाले आहे. राज्यात सध्या सुरू आहे ती कोणती चाटूगिरी आहे तेच कळायला मार्ग नाही’, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर टीका केली.

मुंबईत उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात संबोधित करताना ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले. ‘शिवजयंतीच्या मुहूर्तावर युतीच्या गोष्टी होत असल्याने भविष्यात सोबत राहिलात तर सर्व काही देऊ’, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. ‘शिवसेना पक्ष आणि चिन्ह घेऊन तुम्ही मर्द असाल आणि तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात या’, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाला आव्हान दिले. ‘निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून आम्ही निवडणूक लढवली असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र भाजपनेही काय केले? मोदी ज्यावेळी महाराष्ट्रात येतात, त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याच फोटोचा वापर करावा लागतो. त्यावेळी यांचे राजकारण कुठे जाते’, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

‘मी हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातो. मी काँग्रेससोबत गेलो तेव्हा मी हिंदुत्व सोडले म्हणाले. तुम्ही मेहबुबा मुफ्ती सोबत गेलात तेव्हा काय सोडले होते’, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला. मी भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला नाही अशा शब्दात त्यांनी भाजप, शिवसेना नेत्यांना सुनावले. प्राप्तिकर, ईडी यांच्यासारखे लांडगे विरोधकांवर सोडायचे आणि त्यानंतर मी एकटा लढतोय सांगायचे, याला काय अर्थ आहे असा सवाल करत ठाकरे यांनी मोदी यांच्यावर टीका केली. ‘आज सगळ्या गोष्टी फक्त बुद्धीबळाच्या पटासारख्या झाल्या आहेत. माझ्या पक्षातील काही लोक दुसरीकडे गेले. माझेच लोक मला माझ्याच घरातून बाहेर काढू पाहत आहेत. त्यांना मालक व्हायचे आहे. निवडणूक आयोगाने चोरांना मालक केले आहे. आज जे आमच्यासोबत झाले, ते उद्या तुमच्यासोबत होईल, यासाठी सर्व विरोधकांनी डोळे उघडायला हवेत’, असा इशारा त्यांनी दिला.

ही तर थट्टा

हिंदू आक्रोश मोर्चा निघाला यासारखी तर थट्टा नाही. कारण जगातला सर्वात बलवान व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान आहे तर मग देशातल्या हिंदूंना आक्रोश का करावा लागतो? या देशात जो राहतो तो आमचा बांधव आहे. मग हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय कुणीही असो तो आमचा भाऊबंद आहे आणि हेच आमचे हिंदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले. मुंबईला गुलाम करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *