महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २१ फेब्रुवारी । महाराष्ट्रात दिवसां उन्हाचा तडाखा तर रात्री थंडीची हुडहुडी अशी स्थिती होत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून रात्री किमान तापमानात घसरण होत असल्याचे जाणवत आहे, तर दिवसा उन्हाचा तडाखा बसत असल्याने तापमानात वाढ होत आहे. दरम्यान राज्यात दिवसा पारा 36 अंशांच्या पुढे जात आहे.
तर रात्री किमान तापमान 10 अंशांवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे रात्री थंडीचा कडाका, तर दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांत जळगाव येथे नीचांकी 10.3, तर उच्चांकी 37.5 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. नाशिकमध्येही किमान 11.7 तर कमाल 36.3 तापमान होते.
तापमानातील चढ-उतारामुळे सर्दी- खोकला आदी साथीजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान उत्तर भारतात पावसासह हिमवृष्टी होणार असल्याने राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 33.7 (10.5), जळगाव 35.8 (10.3), धुळे 35.0 (13), कोल्हापूर 34.3 (19.7), महाबळेश्वर 29.6 (16), नाशिक 34.2 (11.7), निफाड 34.1 (8.2), सांगली 35.3 सातारा 34.2 (14.3), डहाणू 32.3 (18.2), रत्नागिरी 35.1 (21), औरंगाबाद 34 (12.2), परभणी 34.4 (14.7), अकोला 36.8 (15), अमरावती 35.4 (16), बुलडाणा 32.6 (17. 4), चंद्रपूर 34 (17.4), गडचिरोली 32.8 (14.2), गोंदिया 33.5 (13.8), नागपूर 35 (15.1) ), वर्धा 36 (16.6), वाशिम (15.2), यवतमाळ 34.2 (15.5).
यंदा राज्यात पाऊस कमी
जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. तज्ज्ञांनुसार, अल-नीनो वर्षांमध्ये दुष्काळाची शक्यता 60 टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के व केवळ 10 टक्के सरासरी पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
26 वर्षांत 5 वेळा अल-नीनो स्थिती राहिली आहे. त्यामध्ये चार वेळा देशात दुष्काळ पडला. 2002 मध्ये भारतात 81 टक्के, 2009 मध्ये 78 टक्के पाऊस झाला. दरम्यान आता अल-नीनो प्रभावाचा पुढील 9महिन्यांसाठी अंदाज उपलब्ध आहे. 2004, 2009, 2014 व 2018 मधील अंदाजही 2023 सारखेच आहेत. यामुळे मागच्या काही काळात दुष्काळ झाला त्या प्रमाणे 2023लाही दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.