महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – पिंपरी चिंचवड : आज सकाळी 9 ते 5 वाजेच्या दरम्यान सम-विषम पद्धतीने सर्व बाजारपेठातील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 100 टक्के कामगारांच्या उपस्थितीत पूर्ण क्षमतेनं उद्योग धंदे आणि 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खासगी आस्थापना सुरू करता येणार आहे. कोरोनावर मात करत रेड झोनमधून बाहेर आल्यामुळे आता पिंपरीमध्ये नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
राज्यात दिवसें दिवस कोरोनाचा शिरकाव वाढत आहे. सुरुवातीच्या काळात सर्वाधित रुग्ण हे पुण्यात होते. पण नंतर पुण्यात काही प्रमाणात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात यश आलं. अशात पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचे बरेच रुग्ण होते. पण आता पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शहर रेड झोनमधून बाहेर आलं आहे.
26 मे पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून 50 टक्के प्रवासी घेऊन सार्वजनिक वाहतुकही धावणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली आहे. दरम्यान, रेड झोनमधून जरी शहर बाहेर आलं असलं तरी कोरोना पुन्हा वाढू नये यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून काही नियम कठोर करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील जीवणावशक्य वस्तूंच्या किरकोळ खरेदी विक्रीसाठी 10 ते 2 ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. याच वेळेत नागरिकांनी बाहेर पडून खरेदी करावी.
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या 252 जणांपैकी 142 कोरोना मुक्त आणि 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशात अजूनही पिंपरी शहरात सध्या 47 कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे या सगळ्या भागात कठोर नियमांचं पालन केलं जाणार आहे. याच्या सुचनादेखील आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात दुकानांना परवानगी दिली आहे. पुण्यात आणि पिंपरीमध्ये अनेक भागात दुकानेही सुरू झाली आहेत. मात्र भीतीपोटी नागरीक अजुनही बाहेर पडायला धजावत नाही, असेच दिसून येत आहे. ज्या व्यवसाय आणि दुकानांना परवानगी दिलीय त्याची वेळ सकाळी 9 ते 5 राहणार असून रात्री 7 ते सकाळी 7 या वेळात संचारबंदी लागूच असणार आहे. मात्र असं असलं तरी बाजारपेठेत गर्दी नाही.