महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी उत्तरेच छापण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रश्न क्रमांक-3 ‘ए’मधील शेवटच्या तीन प्रश्नांमध्ये प्रश्नांऐवजी उत्तरेच छापण्यात आली होती. ही अक्षम्य चूक कशामुळे झाली, याबाबत इंग्रजी विषय शिक्षक, नियामकांमध्ये चर्चा सुरू असून प्रश्नपत्रिकेचे प्रूफरीडिंग झाले का? डीटीपी ऑपरेटरचा दोष आहे की, पेपर सेटरचा? मॉडेल आन्सरशीटचा भाग प्रश्नपत्रिकेत कसा आला… असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
एकीकडे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा पेपरफुटी आणि कॉपी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत, मात्र दुसरीकडे प्रश्नपत्रिका छपाईच्या कामात दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. के. जे. सोमय्या शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख आणि बोर्डाचे मुख्य नियामक तुषार बागवे यांनी सांगितले.