उन्हाळयात बसणार वीज दरवाढीचे चटके ? १ एप्रिलपासून तुम्हाला भरावे लागू शकते जादा बील

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । वीज वितरण कंपन्यांची पंचवार्षिक वीज दरनिश्चिती १ एप्रिल २०२० पासून झाली. तिसरे वर्ष संपताना या पंचवार्षिक वीज दरवाढीचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार वीज कंपन्या अंतिम दोन वर्षांसाठी नव्याने वीज दरांसंदर्भात प्रस्ताव सादर करतात. असा प्रस्ताव मुंबई शहर व उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, टाटा पॉवर व बेस्ट उपक्रम या तिन्ही वितरकांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. याच प्रस्तावावर अलीकडेच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी झाली. तिन्ही कंपन्यांची ही सुनावणी सोमवारी संपली.

या प्रस्तावात तिन्ही वीज वितरकांनी वीजदरात २०२४-२५मध्ये अधिक कपात सुचवली आहे. घरगुती ग्राहक श्रेणीसाठीच्या वीजदरांचा विचार केल्यास, अदानी इलेक्ट्रिसिटीकडून २०२३-२४साठी २ ते ७ टक्के वाढ प्रस्तावित आहे. तर २०२४-२५ दरम्यान मात्र कंपनीने वीजदरात ३ व ४ टक्के कपात प्रस्तावित केली आहे. टाटा पॉवरकडून २०२३-२४साठी तब्बल १० ते ३० टक्के दरवाढ मात्र, २०२४-२५मध्ये ६ व ७ टक्के दरकपात प्रस्तावित केली आहे. बेस्ट उपक्रमने मात्र २०२३-२४ व २०२४-२५ या दोन्ही वर्षी घरगुती ग्राहकांसाठी वीज दरकपात प्रस्तावित केली आहे. २०२३-२४ मधील दरकपात सरासरी ७.३३ टक्के तर, २०२४-२५ मध्ये सरासरी १.१० टक्के कपातीचा प्रस्ताव आहे. यावरच ही सुनावणी घेण्यात आली. मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीचे ३० लाख ग्राहक आहेत. तर, टाटा पॉवरकडून ८ लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. साडेदहा लाख ग्राहकांना बेस्टकडून वीजपुरवठा होतो.

महावितरणने २०२३-२४मध्ये ३७ टक्के व २०२४-२५मध्ये १४ टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. याबाबत मंगळवारी नवी मुंबईतून सुनावणी सुरू झाली. २३ फेब्रुवारीला पुण्यात, २५ फेब्रुवारीला औरंगाबाद, २७ फेब्रुवारीला नाशिक, २ मार्चला अमरावती व ३ मार्चला नागपूर येथे महावितरणतर्फे सुनावणी घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *