समुद्रातील तरंगते सोने ! कोट्यवधींची किंमत? ऐकून हैराण व्हाल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ फेब्रुवारी । उलटी किंवा विष्ठा म्हटले की आपण नाक मुरडतो. मात्र, व्हेल माशांच्या उलटीला कोट्यवधींची किंमत आहे. अमेरिकेसह भारतातही समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाची उलटी म्हणजेच अँबरग्रीस जमवणे किंवा विकण्यास बंदी आहे.तरीही उलटीच्या तस्करीत पोलिसांसह व्यावसायिक मंडळी अडकत असल्याचे गुन्हे शाखेच्या यापूर्वीच्या कारवाईतून उघड झाले आहे. अशा तस्करांवर गुन्हे शाखेचे लक्ष असून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

व्हेल माशाच्या उलटीला ‘अँबरग्रीस’ म्हणतात. अँबरग्रीस, म्हणजे फ्रेंचमध्ये त्याचा अर्थ राखाडी अँबर असा आहे. तज्ज्ञांच्या मते, हा व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा कचरा आहे. हा पदार्थ व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडतो.हा मासा समुद्रातील अनेक गोष्टी खातो. जेव्हा त्याला या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा तो उलटीतून बाहेर फेकून देतो. अँबरग्रीस हा राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ आहे. एक प्रकारे तो मेणापासून बनवलेल्या दगडासारखा घन पदार्थ आहे.

त्याचा वापर नैसर्गिक परफ्युम्स बनविण्यासाठी तसेच महागडे सुगंधी उत्पादने बनविण्यासाठी होतो. अनेक मोठे नामांकित परफ्युम ब्रॅन्ड्स या अँबरग्रीसचा वापर आपल्या उत्पादनात करतात. बाजारात याला कोट्यवधीची किंमत आहे.पर्यावरण खात्याला भीती वाटते की, जर लोक या पदार्थांच्या मागे लागले, तर ते व्हेल माशांना त्रास देऊन पकडतील आणि पर्यायाने त्यांची संख्या कमी होईल. म्हणून या उलटीच्या तस्करीला रोख लावून तस्करांवर कारवाई केली जाते.

 

व्हेल माशाची उलटी म्हणजेच समुद्रातील तरंगते सोने. स्पर्म हा पदार्थ व्हेलच्या पोटात असतो, याचा काही ठिकाणी औषधात, सिगारेट, मद्य तसेच खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठीही वापर केला जातो. याची खरेदी, विक्री करणे हे वन्यप्राणी सुरक्षा अधिनियमअंतर्गत बेकायदा आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यवधी आहे. यावर सरकारने बंदी आणली आहे. तरीही काही मंडळी मोठ्या प्रमाणात याची तस्करी करतात. जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते.

भारतात इतर किनारपट्टीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळत आहे. व्हेल माशामध्ये दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतील आहे.साधारणत: व्हेल हा समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा हा भाग किनाऱ्यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन ५० किलोपर्यंत असते असे अभ्यासकांचे मत आहे. वन्यजीव कायद्यानुसार व्हेल माशाच्या उलटीची विक्री हा गंभीर गुन्हा आहे.

कोणत्याही वन्यजीवाचे कातडे, शिंग, नखे मांस विकता येत नाही, तशी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करता येत नाही. वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम २, ३९, ४४, ४८ (अ), ४९ (ब), ५७, ५१ अन्वये गुन्हा नोंदवत कारवाई केली जाते. – सुनीष सुब्रमण्यन, मानद पशुकल्याण अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *