Pune MNS News : पुण्यात एकाचवेळी मनसे च्या ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, नेमकं कारण काय?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ फेब्रुवारी । एकीकडे पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. पुण्यात एकाचवेळी ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. एकाचवेळी ५० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. 

पुण्यातील (Pune) कसबा निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. मात्र, काही पदाधिकारी महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींना मिळाली. यावर कठोर पाऊलं उचलत पक्षश्रेष्ठीनी ७ कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली.

दरम्यान, या हकालपट्टीनंतर काही पदाधिकारी नाराज झाले. आणि याच नाराजीतून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता पुण्यातील याच ५० पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत कसब्यात रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याची उघड भूमिका घेतली आहे. (Maharashtra Political News)

पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आता मनसेला पडलेल्या भगदाडामुळं त्याचा भाजपलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पदाधिकाऱ्यांची मनसेकडून हकालपट्टी
कसब्यात महाविकास आघाडीचा प्रचार केल्याप्रकरणी मनसेनं (MNS Pune) रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे आणि नीलेश निकम यांची हकालपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी केली होती.

त्यानंतर आता मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याच्या बातम्या आल्यानंतर पुण्यातील मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *