Kasba Bypoll: रवींद्र धंगेकरांचा मोठा निर्णय, कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ फेब्रुवारी । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी प्रचार संपल्यानंतरही थांबायला तयार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, त्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रवींद्र धंगेकर हे शनिवारी सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसणार आहेत. भाजपचे नेते आणि पदाधिकारी हे पोलिसांच्या उपस्थितीत कसब्यातील मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. धंगेकरांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने रवींद्र धंगेकर यांना उपोषणाला परवानगी मिळणार का आणि याचे राजकीय पडसाद उमटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कसब्यात होत असलेला धनशक्तीचा वापर हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात भाजपकडून मोठ्याप्रमाणावर पैसे वाटण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. परंतु, आता रवींद्र धंगेकर यांनी थेट उपोषणाला बसण्याचा निर्णय घेऊन ही लढाई आणखी तीव्र केली आहे. यावर निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल. काल कसब्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. तर २ मार्च रोजी कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत आहे. तब्बल ३० वर्षे कसबा मतदारसंघ भाजपकडे असला तरी यंदाची निवडणूक भाजपसाठी अवघड असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *