विनातिकीट प्रवाशांच्या दंडाला ‘डिजिटल’ पर्याय ; टीसींना क्यूआर कोड मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ फेब्रुवारी । विनातिकीट प्रवास करताना किंवा पास नूतनीकरण करायला विसरल्यास दंडाची रक्कम भरण्यास आता अधिकृतपणे डिजिटल पर्याय उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेने स्थानकांवर कार्यरत तिकीट तपासणीसांना क्यूआर कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रोख रकमेअभावी दंड भरण्यास येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रवासी आणि टीसी यांच्यातील वाद टाळता येणे शक्य होणार आहे.

पानाच्या टपरीवाल्यापासून ते फलाटावरील बूट पॉलिशवाल्यापर्यंत सगळे आपल्या व्यवसायासाठी डिजिटल पेमेंट अर्थात यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी तिकीट तपासणीसांना रोख रक्कम घेण्याच्या सूचना केल्या होत्या. अनेकदा रोख रक्कम नसल्याने प्रवासी आणि टीसी यांच्यात वाद होत होते. यावर उपाय म्हणून टीसींनी फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेता स्टॉलधारकांच्या क्यूआर कोडवर व्यवहार पूर्ण करण्यास सांगत होते. पैसे जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर दंडाची रक्कम टीसी स्टॉलधारकांकडून घेत होते. या द्राविडी प्राणायामामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात होता.

मध्य रेल्वे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी करार करून एक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या रेल्वे खात्याचा क्यूआर कोड टीसीना दिला जाणार आहे. रेल्वेतील टीसीचा क्रमांकांची नोंदणी करण्यात येईल. दंडाची रक्कम खात्यात झाल्याचा मेसेज टीसीच्या नोंदवलेल्या क्रमांकावर प्राप्त होईल. यामुळे प्रवासी आणि टीसी या दोघांच्या वेळेत बचत होईल.

एप्रिलअखेर हे क्यूआर कोड देण्याचा प्रयत्न आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १२०० तिकीट तपासणीस आहेत. यापैकी स्थानकावर कार्यरत असलेल्या टीसींना क्यूआर कोड देण्यात येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *