3 रुपये किलोने विक्री करायचं की, जनावरांना चारायचं; कलिंगड उत्पादक पडले विचारात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ फेब्रुवारी । वाशिम जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचं कलिंगड कवडीमोल दरात व्यापारी घेतात. त्यामुळे मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या कलिंगडांना पाळीव जनावरांना चारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलिंगडाची लाली यावर्षी फिकी पडली. वाशिम जिल्ह्यातील कलिंगडाला व्यापारी अडीच ते 5 रुपये प्रति किलोचा दर देतात. शेतकऱ्यांचा या पिकावरील खर्चही निघणे कठीण झाला आहे. शेतकऱ्यांवर लाखमोलाचे कलिंगड जनावरांना चारण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यात मोरगव्हाण,किनखेड,मेहा परिसरात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांपासून कलिंगड पिकाची लागवड करण्यात आली होती. मोरगव्हाण, किनखेड,मेहासह जिल्ह्यातील 1200 एकरहून अधिक क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड करण्यात आली आहे.

उत्पादन खर्चही निघेना
आता फळे परिपक्व झाल्याने शेतकऱ्यांनी तोडणी सुरू केली आहे. ही फळे हाती येऊ लागताच बाजारात व्यापाऱ्यांकडून अडीच ते 5 रुपये किलो दराने याची खरेदी करण्यात येत आहे. दरवर्षी साधारणतः दहा ते बारा रुपये प्रति किलो एवढ्या दराने व्यापाऱ्यांकडून कलिंगडाची खरेदी करण्यात येत होती. एकरी अडीच ते तीन लाख रुपये एवढे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असते. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी व्यापाऱ्यांकडून अडीच ते 5 रुपये प्रति किलो एवढ्या अल्प दराने मागणी होते. पिकावर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. हजारो रुपये खर्च करून पिकविलेल्या या पिकाला व्यापाऱ्यांकडून अल्प दराने मागणी होते. उत्पादन खर्च ही वसूल होत नाही. त्यामुळे हे कलिंगड नष्ट करत असून ते जनावरांना टाकत आहोत, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

 

खर्च एक लाख उत्पन्न नाहीच्या बरोबर
यंदा मी कलिंगड पिकाची लागवड केली आहे. गेल्यावर्षी चांगल्या दराने कलिंगडाची विक्री केली होती. यंदा दर्जेदार माल असूनही व्यापाऱ्यांकडून अडीच ते 5 रुपये प्रति किलो एवढ्या अल्प दराने मागणी होत आहे. त्यामुळे ही फळे जनावरांना चारण्याची वेळ आली. असं ज्ञानेश्वर अवचार या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यानं आपबिती सांगितली. दीड एकरमध्ये कलिंगड लावले. एक लाख दहा हजार रुपये खर्च आला. व्यापाऱ्याला माल दिला. २० टक्के माल अडीच रुपये किलोने नेला. ८० टक्के माल हा शेतातच सडत आहे. त्यामुळे जनावरांना चारावा लागत आहे. कलिंगड लागडीचा खर्च निघेनासा झाला. शिवाय वाहतूक खर्च परवडत नाही. त्यामुळे कलिंगड उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *