महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । मोबाईलमध्ये बऱ्याचदा नेटवर्क मिळत नाही. त्यावेळी काय करावे कळत नाही. परंतु, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei आणि Apple यांनी गेल्या वर्षी त्यांच्या डिव्हाइसवर बेसिक सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची घोषणा केली होती. या फीचर अंतर्गत, युजर्स आपत्कालीन परिस्थितीत नेटवर्कशिवायही कोणाशीही कनेक्ट होऊ शकतात. दरम्यान, कोरियन कंपनी सॅमसंगने नुकतीच एक मोठी घोषणा केली असून कंपनीने असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे जे स्मार्टफोन वापरकर्त्याला थेट उपग्रहाशी जोडून दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधण्यास मदत करेल. याचाच अर्थ आता नेटवर्कशिवायही लोक एकमेकांशी बोलू शकणार आहेत.
सॅमसंगने त्याला standardized 5G non-terrestrial networks (NTN) असे नाव दिले आहे. कंपनीचे नवीन तंत्रज्ञान Exynos modems मध्ये इंटीग्रेट केले जाईल. अॅपलच्या स्मार्टफोनमध्ये, लोक फक्त आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. परंतु, सॅमसंगने म्हटले आहे की, भविष्यात, Exynos modems मुळे, लोक आपत्कालीन परिस्थितीत केवळ एकमेकांशी संवाद साधू शकणार नाहीत, तर ते सामान्यपणे नेटवर्कशिवाय मजकूर संदेश, एचडी प्रतिमा आणि व्हिडीओ शेअर करू शकतील.
यापूर्वी असे बोलले जात होते की सॅमसंग सॅमसंग गॅलेक्सी S23 सीरीजमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सादर करेल पण तसे झाले नाही. पण कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यानंतर हे सिद्ध झाले आहे की, येत्या काही दिवसात सॅमसंगच्या स्मार्टफोन्सना थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. म्हणजेच, सोप्या भाषेत, आपण हे समजून घेतले पाहिजे की, कंपनी सेल्युलर नेटवर्क काढून टाकेल आणि थेट उपग्रहाच्या मदतीने आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकाल. फोनमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कधी येईल आणि कोणत्या डिव्हाईसमध्ये सपोर्ट असेल, याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. तसेच कंपनी यासाठी शुल्क आकारणार की नाही हे अद्याप समोर आले नाही.