महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ फेब्रुवारी । महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. खंडपीठासमोर आजपासून पुढचे तीन दिवस सलग सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने जेष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडणार आहेत.
मागील सुनावणीच्या वेळी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. मागच्या सुनावणीत राज्यपालांच्या नैतिकतेवर तसंच अधिकारांवर ठाकरे गटाने युक्तिवाद केला होता. तर महाविकास आघाडी आणि पर्यायाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर 39 मतांनी फरक पडला असता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं. ठाकरे गटाने गेल्या सुनावणीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आज शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे.
तर त्यावेळी पदावर असणारे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केल्यामुळे त्यांचीही बाजू या सुनावणीमध्ये मांडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाचा युक्तिवाद होणार आहे. दोन्ही गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.