Kasba Bypoll Election : कसब्याचा आमदार ठरला ? झळकले विजयाचे बॅनर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ फेब्रुवारी । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडलं. तर मतमोजणी गुरूवारी म्हणजेच 2 मार्चला होणार आहे, पण मतमोजणीच्या आधीच काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीला सुरूवात केली आहे. महाविकासआघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर वडगावमध्ये लावण्यात आले आहेत. रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार होते. पण चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली.

कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर अशी लढत होती. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्येही 50.47 टक्के मतदान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *