मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात कसे? आदित्य ठाकरेंनी बाहेर जाण्यास सांगितले..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ फेब्रुवारी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानादेखील सोमवारी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात जाऊन बसले. आदित्य ठाकरे यांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितल्यानंतर ते बाहेर पडले.

अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या सेंट्रल हॉलमधील अभिभाषणाने झाली. हे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी एकेक करून आमदार, मंत्री सभागृहात येत होते. या ठिकाणी आमदारांशिवाय कोणालाही बसण्याची अनुमती नियमानुसार नसते. तरीही नार्वेकर हे आदित्य यांच्यासोबतच सभागृहात आले आणि आदित्य यांच्या मागील रांगेत बसले. तेव्हा त्यांच्याच एका सहकारी आमदाराने ही बाब आदित्य यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर, आदित्य यांनी नार्वेकर यांना निघून जाण्यास सांगितले. सत्तापक्षाकडून उगाच तुमच्या कृतीचे भांडवल केले जाईल, असेही त्यांनी नार्वेकरांना म्हटल्याचे कळते. त्यानंतर नार्वेकर लगेच सभागृहाबाहेर पडले आणि वर असलेल्या प्रेक्षक दीर्घेत जाऊन बसले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा ते विधानसभागृहाच्या प्रेक्षक दीर्घेत बसले होते. आज सेंट्रल हॉलमध्ये आपण चुकून जाऊन बसलो, असा खुलासा नार्वेकर यांनी नंतर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमर्थक आमदार संजय शिरसाट यांनी नार्वेकरांच्या आजच्या कृतीवर टीका केली. आमदार होण्याच्या इच्छेपोटी नार्वेकर मार्ग शोधत आहेत. पण, उद्धवजी आजकाल त्यांना फारसे जवळ करत नाहीत. तसे बरेच आमदार, नेते अन् नार्वेकरही आमच्या संपर्कात आहेत, असे शिरसाट म्हणाले.

आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमदार व्हायची इच्छा आहे की नाही, हे तुम्ही त्यांना (नार्वेकर) विचारा. पण, मला वाटते, की ते चुकून सभागृहात आले. नंतर ते प्रेक्षक दीर्घेत जाऊन बसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *