Jobs ; नोकरी विषयक ; राज्यात 53 हजार पदांची मेगाभरती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ मार्च । शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची 30 हजार रिक्त पदे आणि आरोग्य सेवेतील 23 हजार रिक्त पदे, अशी एकूण 53 हजार पदांची मेगाभरती राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील जवळपास 13 हजार, तर ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेशी निगडित 10 हजार, अशी एकूण 23 हजार पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली. भाजपचे संजय सावकारे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न विचारला होता. राज्यातील आरोग्य सेवासुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

80 टक्के भरतीला अर्थ खात्याची मंजुरी
राज्यात येत्या दोन महिन्यांत 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भरतीबाबत तयारी सुरू असून, लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. पटसंख्येअभावी अनेक ठिकाणी शाळा बंद पडत आहेत. पात्रताधारक डी.एड. आणि बी.एड. शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने अनेक उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यांना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या माहितीने दिलासा मिळाला आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना या भरतीबाबत माहिती दिली होती. येत्या नव्या वर्षात राज्यात 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थ खात्याने शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून, त्यापैकी 50 टक्के पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *