महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ मार्च । पुण्यात ज्या पद्धतीने ‘पीएमपी’कडे दुर्लक्ष करून वाहतूक व्यवस्था खड्ड्यात घालण्यात आली, अगदी त्याच पद्धतीने राज्य सरकार एसटी सेवेकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील दळणवळणाची मुख्य वाहिनी असणारी एसटी जर कोलमडली तर तिचे परिणाम भयंकर असतील. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच एसटीला बळ देऊन ही व्यवस्था सक्षमपणे चालविण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भागभांडवलावर उभा राहिलेला सहकारी साखर कारखाना गैर कारभार करून डबघाईस आणायचा. तो बंद पाडायचा. त्यानंतर तो कारखाना राजकारण्यांनी कमी किमतीत विकत घेऊन खासगीकरणात दुप्पट नफ्यात चालवायचा. तसाच काहीसा डाव सध्या एसटीच्या बाबतीत सुरू आहे. हळूहळू एसटी बंद करायची आणि नफ्यातील मार्गांवर स्वतः च्या खासगी वाहतूक कंपनीच्या बसेस सुरू करून नफा कमवायचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. पण त्याचा फटका एसटीवर अवलंबून असणाऱ्या लाखो प्रवाशांना बसत आहे. अनेक गावांमधील एसटी सेवा बंद पडली असून त्याठिकाणी खासगी वाहनांची असुरक्षित वाहतूक सुरू झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांसह सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
‘गाव तेथे एसटी’ ही एकेकाळी महाराष्ट्रातील लोकप्रिय घोषणा होती. गावात एसटी सुरु व्हावी, यासाठी राजकीय नेत्यांची चढाओढ असायची; पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. एसटींची संख्या कमी झाल्याने ग्रामीण आणि शहरातील नागरिकांनाही झळ बसायला लागली आहे. एसटीचे उत्पन्न १८ वरून १३ कोटी रुपयांवर आले आहे. एसटीच्या एकूण गाड्यांची संख्या १५ हजार ५४२ आहे. त्यापैकी सहा हजार गाड्या विविध कारणांनी बंद पडल्या आहेत. म्हणजेच नऊ हजारांच्या आसपास गाड्या प्रवासी वाहतूक करीत आहे.